आरती

श्रीनृसिंहाची आरती

कडकडीला स्तंभ गडगडीलें गगन |
अवनी होता आहे कंपायमान |
थडथडती नक्षत्रें पडताती जाण |
उग्ररुपें प्रगट तो सिहवदन ||१||
जय देव जय देव जय नरहरिराया |
आरती ओवाळुं महाराजवर्या ||धृ.||

एकवीस स्वर्ग माय डळमळली कैसी |
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासि ||
चंद्र -सूर्य दोन्ही लोपति प्रकाशीं |
कैलासी शंकर दचके मानसीं ||जय.|| ||२||

थरथरती तया जटा जिव्हा लळलळित |
तीक्ष्ण नखांनीं तो विदारीत ||
अर्धांगीं कमलजा शिरींछाया घरित |
माधवदासा स्वामि नरहरि शोभत ||
जय देव जय देव जय नरहरिराया |
 आरती ओवाळूं महाराजवर्या ||३||