History

                                                                                                       Version:   English | राठी


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
::श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर :: स्थान आणि महात्म्य::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

     निरानरसिंहपूर हे स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाखासारखा आहे.
येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहे.या सर्व भक्तांचे श्री नरसिंह हे अधिष्ठान आहे.ते या क्षेत्रास मानतात.इतकेच काय तर ज्यांचा कुलस्वामी नाही अशा हि अनेकांना क्षेत्राचे महात्म्य व रमणीयता जाणवली व ती त्यांनी मान्य केली.अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात व नरसिंहाचा आशीर्वाद घेतात.
     तसेच या क्षेत्राला शास्त्रीय महत्व देखील आहे.असे म्हणजे शास्त्रज्ञानी या क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले कि निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत.हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे.जे अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात.
तसे खूप पुरावे आहेत कि या पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे.पूर्वी पासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे.आपल्याकडे असा पुरावा आहे कि पूर्वी प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा रावणाचा वाढ केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून पूर्ण केली. त्यांनी हि यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरु केली होती.हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हटले जाते कि महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते.समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूर येथे भेट दिली याची प्रचीती येते.शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते.चंपाषष्ठी साठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते.ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान ,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते.
     निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला अंडाकृती प्रचंड असा घाट शके १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला.हे बांधकाम कोणी त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले.सदरील बांधकाम सतत ३ वर्षे चालू होते. पुढे शके १७८७ साली रघुनाथ राव विन्चुरकर यांनी देवालयाचा एकदरीत जीर्णोद्धार केला त्यासंबंदीचा शिलालेख देवालयात उपलब्ध आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
::श्रीचेदेवालय::
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
     सध्याचे श्रींचे देवालय हे उतुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुशिलाचा एक उत्तम नमुना आहे.देवालयाच चारही बाजूंनी रुंद व भक्कम असा भक्कम तट आहे.श्री मूर्तीचा प्रमुख गाभारा त्या पुढील गर्भागार,रंग शिलेचा सभामंडप हे संपूर्ण दगडी बांधकाम असून दगडी छतावरील नक्षी व विविध देवाच्या मूर्ती लक्षणीय आहेत. घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक आहे.पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. रंग शिळेच्या मंडपाचे दोन्ही बाजूस तीन दरवाजे आहेत.ह्या सर्व दगडी दरवाज्यावर जय विजय घडविलेले असून, पितळी दरवाज्यावरील जय-विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत.वेगवेगळया प्रकारच्या नक्षी, घाटदार खांब ,कंगोरे प्रमाणबद्ध व अतीव देखणा असा पितळी दरवाजा येथे आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
::श्रींचीमूर्ती::
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रस्तावना :
     भगवान विष्णूंनी वराह हा तिसरा अवतार धारण करून हिरण्यकशिपुचा वध केला. बंधू वाढणे संतप्त होवून हिरण्यक शिपुने तपाचर्या करून अनेक वर मिळवले.मग मात्र तो पिसाळला.उन्मत्त हिरण्यकश्यपूने देवाशी उगड उगड वैर मांडले.देवांचा राजा इंद्र तो देखील याच्या या करनीने हबकला.हिरण्यकश्यपूचा वध करावा हा हेतू मनी धरून इंद्राने एक कृती केली.हिरण्यकश्यपू राजधनीत नाही हे पाहून त्याने राजधानीवर स्वारी केली. व त्याची गर्भवती पत्नी कयाधू चे हरण केले.या कयाधू सह इंद्र स्वर्गलोकी जात असतानाचा महर्षी नारदांनी इंद्राची भेट घेऊन त्यास सांगितले देवेंद्र या सतीस यत किंचितही पीडा करू नकोस. हिच्या गर्भस्त महान भागवत भक्त असून त्याच्या रक्षणार्थ श्री महा विष्णू अवतार घेतील.नारदांनी हि आज्ञा मानून नारदाच्या कयाधू हिस आश्रमात ठेवून त्याने प्रयाण केले.
     महर्षी नारदाचा आश्रम हा नरसिंहपुरीच भीमेच्या काठी कोटी तीर्थावर होता.तेथेच सती कयाधू तेथेच प्रसूत झाली.महान भगवत भक्त जन्मास आला.नारदांनी त्याला निरा-भीमा संगमावर "ओम नमो नारायण" असा मंत्र देवून गुह्यज्ञान सांगितले.असा भक्त प्रल्हाद नित्य निरा-भीमा संगमी जाऊन तेथे ताप करी.त्याने तेथील वाळूकेची नरसिंह मूर्ती करून तिची मनोभावे अर्चना करावी. असेच ई दिवसी ताप फळास आले.विष्णूंनी मूर्तीमध्ये श्री नरसिंह रूपी दर्शन दिले.व प्रल्हादाला आशीर्वाद दिला


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
::मुख्यमूर्ती::
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

      नरसिंह पुरी देवालयात तीच वाळूची नरसिंह मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे.हि मूर्ती पश्चिमाभिमुख आहे.हि वाळूची मूर्ती विरासनस्थ ,उजवा पाय गुडघ्यात मुडपून उभा,डाव्या पायाची मांडी घातलेली,उजवा हात उजव्या गुडघ्यावर,डावा हात कंबरेवर आहे.रुंद छाती ,बारीक कमर,मुख सिंहासारखे रुंद व उग्र ,भव्य डोळे अशी उग्र चर्या आहे.मुख ,छाती ,कामर सिंहासारखे तर हात पाय मानवी वाटतात.
नरहरी शामराज:
     नरसिंहाच्या मुख्य गाभाऱ्यात श्री नरसिंहाच्या दोन मूर्ती असून दुसरी मूर्ती काळ्या पाषाणाची असून ब्रह्मदेव कृत नरसिंह मूर्ती आहे.त्यात मूर्तीस शामराज असे म्हणतात.म्हणून जय घोषात नरहरे शामराज असा जय घोष होतो.


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: देवालयाच्या आतील मंदिरे::
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देवालयाच्या आतील बाजूस असणाऱ्या परिवार देवता खालील प्रमाणे

१) शेजघर : हे रंगशिळेच्या गाभाऱ्यात असून शेजघरात दोन पलंग आहेत.एक श्री नरसिंहाचा व दुसरा शामराजाचा .पलंगावर गाद्या ,गिर्द्या ,उश्या व श्रींची प्रतिमा आहे.

२) स्तंभ-नरसिंह : रंग शिळेच्या सभा मंडपातील एका स्तंभावर हिरण्यकश्यपूच्या वधाचा प्रसंग कोरलेला आहे.

३) लक्ष्मी मंदिर : श्री नरसिंहाचे डावे बाजूस श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. श्री महालक्ष्मीची रेखीव व सुंदर मूर्ती गंडकी शिळेची आहे.मूर्ती उभी आहे.पूजा बांधल्यावर बसल्यासारखी दिसते.या मंदिराचे शिखर हे दगडी आहे.हे शिखर निरा नदीच्या पात्रापासून सुमारे १५० फुट उंच आहे.शिखराच्या दोन दगडामध्ये एक लहानशी पहात आहे.त्यातून दिवस रात्र पाणी जीरपते.उगमस्थान अज्ञात असलेला हा लहानसा पाझर येथे गुप्त गंगा म्हणून ओळखला जातो.हा एक चमत्कारच आहे.तर्क शास्त्राने याचा उलगडा करता येत नाही.

४) भक्त प्रल्हाद मंदिर : श्री नरसिंहाच्या समोर लाकडी सभामंडपात भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. हात जोडून उभी राहिलेली ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.प्रल्हाद कृत नरसिंह मूर्ती व प्रल्हाद मूर्ती एकमेकांच्या समोर असून नरसिंह मूर्तीच्या पायांच्या समपातलीस या मूर्तीचे मस्तक येते हे एक विशेष आहे.

५) श्री दत्तात्रय मंदिर : दत्तासाठी एक छोटेसे देवालय बांधलेले आहे.हे बांधकाम संपूर्ण लाकडी असून दत्तमूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आहे.हि मनोहर मूर्ती सिंहासनावर स्थापित आहे.

६) भीमा शंकर : देवाच्या उजव्या बाजूस भीमा शंकराचे छोटेसे देऊळ आहे. शाळूकिंच्या मानाने पिंडी उंच आहे.

७) विठ्ठल-रुक्मिणी : भीमा शंकराच्या उजव्या बाजूस छोट्या देवळात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत.दोन्ही मूर्ती पाहिल्यास पंढरपूरची आठवण येते.

८) राघवेंद्र स्वामी वृंदावन : मद्व संप्रदायाचे श्रद्धास्थान मंत्रालय स्थित श्री राघवेंद्र स्वामी हे भक्त प्रल्हादाचा अवतार होत.वृंदावन प्रवेशानंतर त्यांचा प्रत्यक्ष वास मंत्रालय क्षेत्री आहे.मंत्रालय सवे निरा नरसिंहपूर क्षेत्री मी विशिष्ट काळी निवास करेल अशी त्यांची भविष्यवाणी असल्याने शके १८५० साली श्री राघवेंद्र स्वामींचे वृंदावन श्री नरसिंह देवालयात बांधले गेले.दरवर्षी श्रावण महिन्यात आराधना महोत्सव साजरा केला जातो.

९) शालीग्राम : शाकंबरीच्या मंदिराजवळ शालीग्रामाच्या आकाराचा एक मोठा पाषाण आहे.

१०) तरटी नरसिंह : मोठा ओटा त्याच्या केंद्र स्थानी तरटी वृक्ष त्याच्या खाली श्रींच्या चार पादुका असून मंदिरा शेजारच्या दुसऱ्या तरटी वृक्षास पार बांधलेला आहे.

११) शाकंबरी : अठरा भूजांनी युक्त अशी देवीची मूर्ती या मंदिरात आहे.

१२) काशी विश्वेश्वर : खोल गाभारा असलेले शिकार युक्त व महादेवाच्या पिंडी प्रमाणे दिसणारे एक ओबडधोबड मध्यम देऊळ ,समोर बसविलेला एक मोठा दगडी नंदी व गाभाऱ्यातील पिंडी शाळुंका हा काशी विश्वेश्वर येथे आहे.पिंड काढली असता खोलगट भाग दिसतो त्यात तीन लिंग आहेत ते ब्रह्मा ,विष्णू आणि महेश

१३) काळा दत्त : काशी विश्वेश्वराच्या उजव्या बाजूस एका देवळात पाषाणाची दत्ताची मूर्ती आहे.त्यास काळा दत्त असे म्हणतात.

१४) मुहूर्त गणपती : एका स्तंभावरील कमानीत गजाननाची मूर्ती आहे.मुख्य देवालय बांधण्याअगोदर ही मूर्ती स्थापन केली.

१५) काळभैरव : पूर्व दरवाज्याकडे भैरव नाथाचे देऊळ ओवरीत आहे.हे स्थान सोनारी येथील भैरव नाथाच्या दोन मूर्ती आहेत.

१६) रामेश्वर : लक्ष्मी मंदिर लगत एक रामेश्वराचे हे देऊळ आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

::गॅजेटमधील निरा-नरसिंहपूरची नोंद ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
::प्रचंड घंटा ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

     देवालयाच्या पश्चिम दरवाज्याकडे प्रल्हाद मंदिराच्या पाठीमागे वाजविण्याची जी प्रचंड घंटा बांधलेली आहे.ती श्री लक्ष्मी नरसिंह संनादिनी म्हनुन ओळखली जाते.ही घंटा वसई येथील पोर्तुगीज चर्च मधील प्रार्थनेसाठी वापरल्या जात होत्या. इ.स. १७३९ साली पुण्याचे पेशवे चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर त्या लुटून पुण्यास आणल्या.श्रीमंत पेशवे यांनी या घंटा निरनिराळ्या देवस्थानाला पाठवून दिल्या.त्यापैकीच एक सदाशिव माणकेश्वर यांच्या प्रयत्नाने निरा नरसिंहपूर येथे आणण्यात आली.सोनार जातीतील बाबा नावाचा पैलवान याच काळात होऊन गेला.देवालयाचा माडीजवळ याचा पुतळा असुन मोठ मोठी झाडी तो सहज उपटीत असे.वरील प्रचंड घंटा याने डाव्या हाताने पेलून उजव्या हाताने बांधली आशी आख्यायिका आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: नीरा भीमा संगम घाटाची वैशिष्टे ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नीरा भीमा या नद्याच्या संगमावरील घाटामध्ये शिल्प सौंदर्य लक्षणीय आहे. घाटाच्या पायऱ्यात बसविलेल्या मोठ्या दगडातून हत्तीचे शिल्प घडविले आहेत.संगमात स्नान करून संगम घात चडत असताना आपली सोंड वर करून भक्ताला अभिवादन करून स्वागत करतात. हत्ती व सिंह यांची जोडी लक्षह वेधते शिवाय मगरीचे पाच शिल्प आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: सोळखांबा मंदिर ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाधजी मुधोजी यांनी संगम घाट बांधला तसेच या घाटावर सोळा दगडी खांबांनी युक्त असे दगडी देव आहेत.या देवालयाच्या मध्यभागी आश्वस्थरुपी नरसिंह गणपती मारुती शिवलिंग व वटवृक्ष या देवता आहेत. या पाराचा जीर्नोद्धार रघुनाथ विंचूरकर यांनी केला. देवालयाच्या पुढच्या बाजूस दीपमाळ व जानकेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. सतीपत्नी जानकीबाई यांच्या स्मरणार्थ रघुनाथ विंचूरकर यांनी शके १८०३ साली  हे शिवमंदिर बांधले.  
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: नीरा नदीवरील पवित्र तीर्थे ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 १)    लक्ष्मी तीर्थ : मुख्य देवालयाच्या पश्चिम दरवाजाच्या डाव्या बाजूस घाट असून त्यावर श्रीलक्ष्मीचे देवालय आहे.या स्थानीय लक्ष्मीने तपश्चर्या केल्याने तिचा चंचलत्वाचा दोष निघून गेला.त्यामुळे या तीर्थास लक्ष्मी तीर्थ म्हटले जाते.
२)    पद्म तीर्थ : लक्ष्मी तीर्थाच्या वरील बाजूस पद्म तीर्थ आहे.लक्ष्मीने तप केले तेव्हा श्री नरसिंह प्रसन्न झाले. भागवत दर्शनाच्या आनंदाने लक्ष्मीच्या हातातील पद्म या स्थानी गळून पडले.तसेच कुबेराला धनप्राप्ती याच ठिकाणी झाली.
३)    शंख तीर्थ : नरसिंहाचे शंख नावाचे आयुध या ठिकाणी वास्तव्य करते.
४)    पिशाच्च विमोचन तीर्थ : पित्र-पिशाच्च योनीतून मुक्त होण्यासाठी या तीर्थावर स्नान करणेविषयी सांगितले आहे.या तीर्थावर नारायण नागबली , त्रिपिंडी (पिंडदान) , कालसर्प योगशांती , ग्रहशांती , नक्षत्र शांती  या सारखे विधी केल्याने सर्व दोष नाहीसे होतात.
५)    नरसिंह तीर्थ : हिरण्यकश्यपूचा वाढ केल्यानंतर श्री नरसिंहानि याच स्थानी  वास्तव्य केले . हे स्थान एकांत रम्य असून येथे नीरा नदीवर घाट बांधला आहे.या घाटावर डोंगर कपारीतील मंदिरात श्री नरसिंहाची तांदळास्वरूप मूर्ती आहे.बाजूस यात्रेकरूंसाठी ओवऱ्या बांधल्या असून त्यापैकी एका ओवरीत मारुतीची मूर्ती आहे. येथील एकांत इतका अदभूत आहे की येथे जलप्रवाहाच्या ध्वनीशिवाय अन्य कोणताही ध्वनी येथे ऐकू येत नाही.

तसेच याठिकाणी हंसतीर्थ , इंद्रतीर्थ, तारातीर्थ, दुर्वासतीर्थ , कपिलतीर्थ,गणेशतीर्थ इत्यादी तीर्थे आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: भीमा नदीवरील पवित्र तीर्थे ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

१)    दुर्गा तीर्थ :
या तीर्थावर दुर्गा मातेचे स्थान असून डोंगर कपारीत छोटेसे देऊळ बांधलेले आहे.तेथे दुर्गेचा तांदळा  आहे.यालाच ईवराई असे म्हणतात.
२)    कोटी तीर्थ : या तीर्थावर नारदमुनींचा आश्रम होता.या ठिकाणी सर्व देव देवता श्री नरसिंहाची उपासना करतात.
३)    गो तीर्थ : कामधेनुने या ठिकाणी नरसिंहास अभिषेक केला.
४)    भानू तीर्थ : भगवान सुर्यानारायांची हि तपोभूमी. सूर्यग्रहण , संक्रमण व पर्वकाळ , रविवार , रथसप्तमी या दिवशी येथील स्नानाचे महत्त्व आहे.
५)    चक्र तीर्थ : भक्तप्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतांनी चक्र पाठविले. त्याचा उदय या स्थानी झाला.

तसेच या ठिकाणी नदतीर्थ , पाशतीर्थ, लांगलतीर्थ, मौसलतीर्थ असे अनेक तीर्थे संगमा सानिध्यात आहेत. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: श्री’स होणारे नित्य पूजा विधी व उपचार ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
काकड आरती : पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्री’सह सर्व परिवार देवतांना काकड्याणे ओवाळतात.यावेळेस श्रींस खिचडीचा नैवैद्य दाखविला जातो.

प्रातःपूजा : सकाळी ७ वाजता पहिल्या प्रहरात हि पूजा पूर्ण होते.श्री नरसिंह व श्री शामराज या दोन्ही मूर्तीस पंचामृत स्नान घालून षोडशोपचार पूजा होते.नरसिंहपूर प्रथेनुसार ऋग्वेदीय व सामवेदीय सुक्तांनी तसेच पौराणिक मंत्रांनी पूजा केली जाते.नंतर श्री मूर्तीस पोशाख परिधान केला जातो.धूप दीपाने आरती होऊन श्रीस पायसाचा नैवैद्य दाखविला जातो.नंतर परिवार देवतांची पूजा केली जातो.

माध्यान्हपूजा : दुपारी १२ वाजता श्रींस पुरणपोळीचा महानैवैद्य दाखविला जातो.व महाआरती केली जाते.

सायंपूजा : सायंकाळी ७ वाजता श्रींस पंचोपचारे मंत्र स्नान घालून धूप दीप नैवैद्य युक्त पूजा केली जाते.या वेळी नगार खाण्यातील नगारा नौबत ,झांज , घाटी वाजवली जाते.

शेजारती : रात्रौ ९ वाजता श्रींची शेजारती केली जाते.शेजारती नंतर चम्पूप्रार्थना म्हणण्यात येऊन श्रींस दुधाचा नैवैद्य दाखविण्यात येतो.या सर्व विधी नंतर श्री नरसिंहाची क्षमा मागून पूजाधिकारी द्वारे बंद करतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: पूजा-विधी ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नीरा-नरसिंहपूर येथे आल्यानंतर श्रींना कुलधर्म कुलाचार करता येतो.या मध्ये प्रकार पुढीलप्रमाणे :
१)    महापूजा , महावस्त्र1 सेवा ( पवमान पंचसुक्त दुग्ध अभिषेक , महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार )
२)    पंचामृत अभिषेक  ( अभिषेक , महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार )
३)    पाद्यपूजा अभिषेक (पुरुषसुक्त अभिषेक)
४)    चरण पूजा
५)    नंदादीप सेवा (अखंड/वार्षिक/मासिक/साप्ताहिक)
६)    वसंत पूजा
७)    कुंकुमार्चन
८)    महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार
९)    अलंकार पूजा
१०)    महालक्ष्मीस साडी व ओटी अर्पण

1.    श्रींची महावस्त्रे: धोतर/ सोवळे, शाल / उपरणे , बाराबंदी (अंगरखा),पुणेरी पगडी
2.    महालक्ष्मीची महावस्त्रे: नऊवारी साडी व खण/पीस
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: मराठी वर्षामध्ये होणारे सण व उत्सव ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 चैत्र : गुढी पाडव्याच्या दिवशी श्रींना पवमान (पंचसुक्त) अभिषेक करण्यात येतो.व अलंकार पूजा बांधण्यात येते तसेच मंदिरात गुढी उभारण्यात येते.रामनवमी दिवशी रामजन्म सोहळा तसेच हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.या दरम्यान शिखर शिंगणापूर येथे श्री महादेवाच्या दर्शनासाठी यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर येतात.
वैशाख : वैशाख नवरात्र महोत्सव – हा येथील सर्वात मोठा उत्सव. वैशाख शुद्ध ६(षष्ठी) श्रींचे नवरात्र उत्सवास प्रारंभ होऊन वैशाख शुद्ध १४ (चतुर्दशी)या दिवशी नरसिंह जयंती सायंकाळी जन्मकाळ सोहळा होतो.वैशाख शुद्ध १५ (पौर्णिमा) या दिवशी पारणे केले जाते त्या रात्री श्रींच्या पादुका पालखीत ठेवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. दुसरे दिवशी दही हंडी काला व लळीत होऊन उत्सवाची समाप्ती होते या दरम्यान उत्सवामध्ये श्रींसमोर भक्ती संगीत , भजन , व्याख्यान , प्रवचन व रात्रौ नारदीय कीर्तन सेवा इत्यादी कार्यक्रम केले जातात. उत्सव काळात श्रींस विविध अलंकार पूजा चंदनउटी पूजा , पुष्प रचना पूजा , महावस्त्र पूजा बांधण्यात येतात.संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरसिंह भक्त कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येतात.
जेष्ठ : जेष्ठ शु. १ ते जेष्ठ शु. १० या दशहार पर्वकाळामध्ये श्रींस अनेक भक्तांकडून सेवा अर्पण केली जाते. वटपौर्णिमेस सुवासिनीकडून वडपूजन केले जाते.
आषाढ : आषाढी एकादशीस श्रींना महापूजा करण्यात येते.आषाढ शु. १५ ( गुरु पौर्णिमा ) स भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात.
श्रावण : नागपंचमीच्या दिवशी मंदिरामध्ये नागपूजन व सामुदाईक श्रावणी केली जाते.तसेच गोकुळ अष्टमीस सप्ताह आयोजन करून श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो.
भाद्रपद : गणेश चतुर्थी उत्सव – मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.गणपती अथर्वशीर्ष पठण व गणेश यागाचे आयोजन केले जाते.
आश्विन : अश्विन शु.१ ते अश्विन शु.९ शारदीय नवरात्र उत्सव मंदिरामध्ये साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी श्रींस व महालक्ष्मीस महाअभिषेक , महावस्त्र पूजा अर्पण करण्यात येते.सायंकाळी सीमोल्लंघणासाठी श्रींची पालखी निघते.गावाच्या वेशीवर जाऊन आपटा पूजन करून सोने लुटण्याचा कार्याक्रम होतो.नरक-चतुर्दशी दिवशी पूजाधिकारी दंडवते यांच्याकडे कुरवंड्या श्रींस ओवाळतात.श्रींस अलंकार पूजा बांधलेली असते.श्रींची पालखी संगमावर जाते.
कार्तिक : बलीप्रतीपदेदिवशी पहाटे श्रींस अभ्यंग स्नान घालून श्रींस अलंकार पूजा बांधली जाते ,या दिवशी डिंगरे पूजाधिकारी यांच्याकडे कुरवंड्या असतात. याहि दिवशी पालखी संगमावर जाते. तुळशी विवाह- कार्तिक शु.१२ या दिवशी श्रींचा तुल्शीशी विवाह लावला जातो.वैकुंठ चतुर्दशीस गरुडाची (वाहन) सवाद्य मिरवणूक काढली जाते.
मार्गशीर्ष :  मार्गशीर्ष शु. पौर्णिमा या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होतो.शके १७८७ साली रघुनाथराव विंचूरकरांनी देवालयाचा जीर्णोद्धार करून याचा उत्सर्ग केला होता.याचा वर्धापनदिन प्रतिवर्षी मार्गशीर्ष व.९-१० या दिवशी केला जातो.
पौष : भोगीच्या दिवशी श्रींची पालखी निघते.मकर संक्रांतीचे दिवशी सुवासिनी श्रींस व लक्ष्मीस वाणवसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
माघ : माघी एकादशी व महा शिवरात्रि या दिवशी नीरा-भीमा संगम स्नान करून भक्त दर्शनास येतात.
फाल्गुन : पौर्णिमेचे दिवशी देवालायामध्ये होळीकापूजन करतात. रंगपंचमीचे दिवशी श्रींस श्वेत रंगाचा पोशाख परिधान करून श्रींचे अंगावर केशरी रंगाची उधळण केली जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
:: नीरा-नरसिंहपूर येथे कसे याल? ::
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१)    बस सेवा –
पुणे येथून सोलापूर जाणाऱ्या बसने टेभुर्णी येथे उतरावे.टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे.तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.पुणे ते नरसिंहपूर अंतर १८५ किमी आहे.

पुणे-इंदापूर- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर

पंढरपूर अकलूज मार्गाने येताना अकलूजहून टेंभुर्णी जाणाऱ्या बसने संगम येथे उतरावे. तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.

पंढरपूर-अकलूज- संगम-नीरा नरसिंहपूर

२)    रेल्वे सेवा –
पुणे स्टेशन येथून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेने कुर्डूवाडी जंक्शन येथे उतरावे.कुर्डूवाडी ते टेंभुर्णी बसने प्रवास करावा. टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे.तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.

पुणे-कुर्डूवाडी- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर

नरसिंहपूरला भेट देण्याची योग्य वेळ :-
नीरा नरसिंहपूर येथे वर्षभरामध्ये कधीही येऊ शकता.पावसाळ्यामध्ये तुम्ही नीरा व भीमा या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचा आनंद घेऊ शकता.हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूमध्ये आल्हाददायक वातावरणामध्ये येऊ शकता.
निवास व्यवस्था :-
नीरा नरसिंहपूर देवालयात भक्तांसाठी देवालयात खोल्या उपलब्ध आहेत व क्षेत्रोपाध्याकडे निवास व भोजन व पूजाविधी करण्याची सोय आहे.तसेच लॉजिंगसाठी टेंभुर्णी येथे व्यवस्था आहे.